जालना- कोरोनाचा विळखा राज्यात वाढत आहे. यासाठी खबरदारी म्हणून शासनाने गर्दीचे ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जालना नगरपालिकेच्या मालकीचे मोतीबाग छत्रपती संभाजी उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत हे उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे.
जालन्यातील छत्रपती संभाजी उद्यान बंद... हेही वाचा-जोतिबाची चैत्र यात्रा रद्द; कोल्हापूरातील मंदिर, मशीद, चर्चसुद्धा दर्शनासाठी बंद
नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यावतीने त्यांचे पती तथा आमदार कैलास गोरंट्याल यांनी हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आमदार गोरंट्याल हे आजारी असल्यामुळे नागरिकांना भेटत नसल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत. मात्र, मी आजारी नाही असे सांगून गोरंट्याल यांनी अफवांचे खंडण केले.
दरम्यान, कोरोना आजाराबाबत जालना नगरपालिका विविध उपक्रम हाती घेत आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी. त्यात सोबत नगरपालिकेशी संबंधित असलेली कामे करण्यासाठी नगरपालिकेमध्ये न जाता नगरपालिकेच्या वेबसाइटवर जाऊन तक्रारी व सूचना कराव्यात. त्यासोबत भ्रमणध्वनी वरही संपर्क साधून अडचणी सांगाव्यात. नगरपालिकेच्या वतीने या सर्व तक्रारींचा निपटारा केला जाईल. नागरिकांनी वैयक्तिक कामासाठी प्रत्यक्ष भेटण्याची गरज नाही. त्यासाठी संबंधित यंत्रणेला किंवा प्रत्यक्ष आपणाला बोलावे, असेही गोरंट्याल म्हणाले.