जालना-शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून चांदई टेपली येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या तुंबळ हाणामारीत सुरेश अशोक टेपले (वय २५) गंभीर जखमी झाला होता. या तरुणाचा शनिवारी जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मारहाणप्रकरणी हासनाबाद पोलीस ठाण्यात दोन गटातील २२ जणांविरुद्ध परस्परांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
चांदईत झालेल्या तुंबळ हाणामारीतील जखमी तरुणाचा मृत्यू - chandai incident
चांदईत शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुरेश टेपले याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली येथे बुधवारी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत कुऱ्हाडी, फावडे, वखराच्या लोखंडी आणि तीक्ष्ण हत्याराचा वापर करण्यात आला होता. एका गटातील १५ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत अशोक टेपले, त्यांचा मुलगा सुरेश टेपले व घरातील चार जण जखमी झाले.
अशोक टेपले व सुरेश टेपले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जालन्यातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरेश टेपले याचा शनिवारी दुपारी तीन वाजता डॉ. प्रल्हाद धारूरकर यांच्या परिणिका न्यूरोकेयर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. मयत तरुण हा जालना येथील मत्स्योदरी विधी महाविद्यालयात कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत होता. त्याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके हे करत आहेत.