महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबडच्या व्यापाऱ्याने नऊ कर्मचाऱ्यांची घडवून आणली हवाई सफर

अंबडच्या एका व्यापाऱ्याने त्याच्या दुकानातील 9 कर्मचाऱ्यांना हवाई सफर घडवून रामोजी फिल्मसिटी दाखवली आणि एक वेगळाच पायंडा पाडला. यामुळे नोकर वर्ग आनंदी असून व्यापाऱ्याचेही कौतुक केले जात आहे.

हवाई सफर

By

Published : Jul 9, 2019, 10:53 AM IST

जालना - दुकानात काम करणारा नोकर किंवा कामगार म्हणजे अगदीच गरजू, गरीब आणि स्वाभिमान गहाण टाकलेला, अशी परिस्थिती बहुतांश ठिकाणी आढळते. त्यांना वेळच्या वेळी मजुरी मिळत नाही, दर्जाही तसा मिळत नाही. मात्र, अंबडच्या एका व्यापाऱ्याने त्याच्या दुकानातील 9 कर्मचाऱ्यांना हवाई सफर घडवून रामोजी फिल्मसिटी दाखवली आणि एक वेगळाच पायंडा पाडला. यामुळे नोकर वर्गातून या व्यापाराचे कौतुक होत आहे, तर दिवसभर रामोजी फिल्म सिटी पहायला मिळाल्याने आनंदही व्यक्त केला जात आहे.

निलेश लोहिया यांनी दुकानात काम करणाऱ्या 9 कामगारांचा हवाई सफर घडवून आणला


अंबड येथील स्वाती ट्रेडर्स या होलसेल किराणा मालाचे व्यापारी निलेश लोहिया आणि त्यांचे बंधू योगेश लोहिया यांनी सुमारे 18 वर्षांपूर्वी एक किराणा दुकान सुरू केले. त्याचे परिवर्तन आज होलसेल किराणामध्ये झाले आहे. दुर्दैवाने निलेश यांचे बंधू योगेश लोहिया यांचा 2018 मध्ये मृत्यू झाला आणि व्यवस्थापनाची जबाबदारी एकट्या निलेशवर येऊन पडली. वडील मदनलाल लोहिया हे अत्यंत अडचणीच्या वेळेसच दुकानात येतात. माणसांच्या कमतरतेमुळे अशा परिस्थितीत न डगमगता त्यांनी नोकरांच्या मदतीने कारभार सांभाळला.


सध्या दुकानात 9 कामगार असल्यामुळे त्यांच्या साहाय्यानेच आपला हा व्यवसाय चालत आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे या कामगारांची आर्थिक, मानसिक बाजू, भक्कम ठेवण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सक्षम करण्यासाठी निलेश लोहिया यांचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, 29 जून रोजी लोहिया यांनी या 9 कामगारांचा हवाई सफर घडवून आणला. एका एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी दुपारी 2 वाजता अंबड येथून या कामगारांना औरंगाबादला पाठविले आणि तेथून हे कामगार विमानाने हैदराबादला गेले. तिथे गेल्यानंतर रविवारी दिवसभर रामोजी फिल्मसिटी पाहिल्यानंतर रेल्वेच्या प्रवासाने सोमवारी सकाळी जालन्यात पोहोचले. नोकर कामगार यांची मानसिकता चांगली राहावी म्हणून हवाई सफर सोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही त्यांच्या पॉलिसीज काढलेल्या आहेत. यापैकी काही नोकर हे दुकान सुरू झाल्यापासून इथे कार्यरत आहेत. नोकरही मालकाबद्दल समाधानी असून त्यांना हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटी येथे मिळालेला आनंद ते इतर कामगारांना कौतुकाने सांगत आहेत.


अंबड पासून निघाल्यानंतर विमान भाडे, हैदराबादचा खर्च आणि परत जालन्याला येण्याचा खर्च असा सुमारे 75 हजार रुपयांचा खर्च निलेश लोहिया यांनी या कामगारांवर केला आहे. निलेश यांनी सहा महिन्यापूर्वी शिर्डी येथील वॉटर पार्कला या कामगारांना पाठविले होते. त्यावेळी देखील पंचवीस हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details