जालना -उच्चभ्रू वस्तीतील एक सदनिका फोडून 13 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार आज मध्यरात्री घडला आहे. शर्मा नामक व्यक्ती राजस्थानवरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
उच्चभ्रू वस्तीतील घरातून 13 लाखांचा मुद्देमाल लंपास; संधी साधून चोरट्यांनी मारला डल्ला जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात सकलेचा नगर आहे. यात कुणाल शंकरलाल शर्मा (वय 30) हे आपल्या आई-वडिलांसह राहतात. त्यांची पत्नी सोनू शर्मा या एक महिन्यापूर्वी राजस्थानमध्ये माहेरी गेल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी कुणाल शर्मा कुटुंबीयांसोबत राजस्थानकडे रवाना झाले. यानंतर त्यांचे घर राखण्यासाठी भानुदास पवार व भोपनलाल शेंडीवाले यांना ठेवले होते. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री शर्मा कुटुंबीय घऱी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे कळले. गच्चीवरून घरात प्रवेश करून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे लक्षात आले.
चोरटे बाजूच्या घरातून दुसऱ्याच्या गच्चीवर चढले. यानंतर त्यांनी शिडी लावली; आणि शर्मा यांच्या गच्चीवर गेले. गच्चीचा दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. चोरलेल्या मुद्देमालात दहा तोळे सोने, तीन लाख रुपये किमतीचा एक राणी हार, एक लाख 80 हजार रुपयांची साखळी, 75 हजारांची अडीच तोळ्याची पोत, 75 हजारांची सोन्याची अंगठी, 60 हजारांची एक अंगठी, 60 हजाराचे कानातले टॉप्स, पन्नास हजारांचा हिऱ्यांचा जोड आणि पाच लाख रुपये नगद असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा यासंबंधी सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ञांनी देखील पाहाणी करून माहिती घेतली आहे.