महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 3, 2020, 5:22 PM IST

ETV Bharat / state

धक्कादायक..! जन्मदात्या आई-वडिलांवर मुलानेच घातले कुऱ्हाडीचे घाव; आई ठार

२ जानेवारीला रात्रीचे जेवण झाल्यावर उत्तम चव्हाण आणि ठकूबाई चव्हाण, भारती संजय चव्हाण झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा मुलगा दिलीप याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने अमानुषपणे वार केले. या घटनेत आई ठकूबाई ठार झाल्या. तर वडील उत्तम चव्हाण गंभीर जखमी झाले.

boy-was-killed-by-his-parents-in-jalna
मुलाने कुऱ्हाडीने आई वडिलांवर केले वार

जालना - वयोवृद्ध जन्मदात्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातल्याची खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथे घडली. या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला बदनापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथे मोलमजुरी करणारे उत्तम घुमाजी चव्हाण (वय 70) व ठकूबाई उत्तम चव्हाण (वय 60) असे वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले असून एक मुलगा त्याच्या सासुरवाडी शेगाव येथे राहतो, तर दुसरा शेजारीच राहतो. मात्र, तो सध्या ऊसतोडीच्या कामाला बाहेरगावी गेला आहे. त्यांचा तिसरा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण (वय 36) हा काहीसा मनोरुग्ण असून त्याचा पत्नीने त्याला सोडले आहे. दरम्यान, २ जानेवारीला रात्रीचे जेवण झाल्यावर उत्तम चव्हाण आणि ठकूबाई चव्हाण, भारती संजय चव्हाण झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा मुलगा दिलीप याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने अमानुषपणे वार केले. या घटनेत आई ठकूबाई ठार झाल्या. तर वडील उत्तम चव्हाण गंभीर जखमी झाले. आरोपी आई वडिलांवर घाव घालत असताना १६ वर्षीय भारतीने आरडाओरड केली. यामुळे घटनेबाबत ग्रामस्थांना माहिती मिळाली

यानंतर उपसरपंच कल्याण पवार, राजू राठोड, सुभाष चव्हाण, बाळू चव्हाण यांनी तत्काळ बदनापूर पोलिसांना संपर्क साधला. पोलीस मुख्य जमादार नितीन ढिलपे, किशोर पुंगळे, गजानन बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळी पोहचले असता घरात आई - वडीलांवर वार करून त्याच ठिकाणी बसलेल्या दिलीपने पोलिसांना बघून घराचा दरवाजा आतून बंद केला. पोलिसांनी घराचे पत्रे काढून घरात प्रवेश केला व आरोपी दिलीप याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. उत्तम चव्हाण व ठकूबाई चव्हाण यांना बदनापूरच्या ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र, तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीही न करता दोघांना जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर ठकूबाई मृत असल्याचे सांगितले असून उत्तम चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारती संजय चव्हाण (वय १६) हिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३०२,३०७, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बदनापूर न्यायालयात दुपारी ३ वाजता हजर करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details