जालना- भाजप माजी सैनिक आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असा विश्वास राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी व्यक्त केला. भाजप माजी सैनिक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अरुणा शिरसाट आणि बाजीराव मुळक यांच्यावतीने, सैनिक लॉनवर राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
माजी सैनिकांच्या समस्यांना भाजप माजी सैनिक आघाडी वाचा फोडणार
भाजप माजी सैनिक आघाडीच्यावतीने महाराष्ट्रातील माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यात येतील, असा विश्वास राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी व्यक्त केला आहे.
युती सरकार सत्तेवर येण्यापूर्वी अशी कोणतीही माजी सैनिकांची आघाडी कार्यरत नव्हती. मात्र, युती शासनामुळे माजी सैनिकांना सन्मानाची वागणूक मिळाली आहे. शहीद झाल्यानंतर संबंधिताचे मृतदेह त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचविण्याचे काम हे शासन करीत आहे. तसेच माजी सैनिकांप्रति शासनामध्ये आत्मीयतेची भावना आहे. यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी सैनिकांनी भाजपसाठी काम केले होते. त्यामुळे सरकारदेखील माजी सैनिकांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणार आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाला महिला आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण अंकुशे, सचिव अशोक हंगे, संघटक अविनाश ढोले, यांच्यासह महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा पुष्पा मुंडे, उपाध्यक्ष निर्मला पवार, सुदाम साळुंखे, मदन झाल्टे, सुनिता गायकवाड, वंदना सवडे आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती. मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, आदी विभागातून पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आले होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास शिरसाठ यांनी केले होते.