जालना- तंबाखुची अवैध वाहतूक करणारा एक आयशर ट्रक भोकरदन पोलिसांनी दावतपूर-टाकळी रस्त्यावर पकडला. गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण १३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकमधून गायछाप तंबाखुची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे भोकरदन पोलिसांनी तालुक्यातील दावतपूर-टाकळी शिवारात सापळा लावून संशयित ट्रक (क्रमांक. एमएच २१. बी.२९५५) अडवला आणि त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये गायछाप तंबाखू असलेले १४ पोते आढळून आले. चालक गणपत दगडू इंगळे (४०,रा. आसई, ता. जाफ्राबाद) याच्याकडे याबाबत चौकशी केली असता, हा माल माहोरा (ता. जाफ्राबाद) येथील एका व्यापाऱ्याचा असल्याचे त्याने सांगितले.