जालना - घारेवाडी येथील शिवारात १४ नोव्हेंबर रोजी रामदास गावंडे यांच्या शेतात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. यानंतर भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
'त्या' महिलेच्या खुनातील आरोपी दोन तासात गजाआड; भोकरदन पोलिसांची कामगिरी संबंधित महिलेचा मृतदेह कुजल्याने त्याची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, भोकरदन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संबंधित महिला नूर कॉलनी, आव्हाना रस्ता (सिल्लोड) येथील असल्याची माहिती मिळवली. पंचीफुला धनाजी करताडे (वय-43) असे या महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधित प्रेतावर घाटी दवाखाना,औरंगाबाद येथे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर संबंधित महिलेचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देऊन सिल्लोड येथे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दि.17 नोव्हेंबरला मृत महिलेच्या मुलाने (विजय धनाजी करताडे) आईच्या मरणाबाबत संशय व्यक्त करून पोलिसांत तक्रार देऊन अज्ञात आरोपी विरोधात कलम 302 , 201 अन्वये गुन्हा दाखल केला.
त्यानुसार पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांचे सहकारी सह-पोलीस निरीक्षक बी.बी. वडदे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून सदाशिव कृष्णा घारे नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. संबंधित व्यक्तीची विचारपूस केल्यानंतर त्याने हा खून केल्याची कबूली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
सदाशिव कृष्णा घारे या आरोपीने त्याच्या पत्नीच्या निधनानंतर पंचीफुला करताडे या शारिरीक संबंध प्रस्थापित केले होते. दि. 10 नोव्हेंबरला त्याने संबंधित महिलेला फोन करुन शेतात बोलावले. या ठिकाणी दोघांमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याने महिलेचा गळा आवळून हत्या केली.
मृत पावलेली महिला लग्नासाठी आग्रह धरत असल्याने त्याने साडीने गळा आवळला; व प्रेताची ओळख लपवण्यासाठी रामदास गावंडे यांच्या कपसाच्या शेतात मृतदेह लपवल्याची कबूली दिली आहे.