बदनापूर -कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरू असतानाच शासनाच्या वतीने महिलांच्या जनधन खात्यावर व पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्यामुळे ही रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे, परंतु बदनापूर येथील महाराष्ट्र बँकेने यावर तोडगा शोधला असून शेतकऱ्यांची गर्दी कमी होण्यासाठी पॅटर्न ठरवला असून असे हा बदनापूर पॅटर्न सर्व बँकांनी राबवणे सद्यस्थितीत गरजेचे आहे.
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी 'बदनापूर पॅटर्न' कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वत्र लॉकडाऊन–संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असतानाच महिला व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या शासनाकडून पैसे टाकण्यात आलेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना कामच उपलब्ध नसल्यामुळे या पैशांचा आधार होत आहे. त्यासाठी नागरिकांनी बँकांत गर्दी केलेली दिसून येते. राज्यभरात विविध बँक शाखेत महिला व पुरुषांच्या लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. कित्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सचेही बारा वाजलेले दिसून येतात. या परिस्थितीत बदनापूर येथील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक चेतन वानखेडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यावरही तोडगा काढण्याचा प्रयत्न करून बँकेतील गर्दी कमी कशी होईल याचे नियोजन केले आहे.
ग्रामीण भागात जाऊन घरपोच सेवा देताना बँक प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्र बदनापूर शाखेने आजूबाजूच्या ग्रामीण भागातील महिला व वृध्दांना बँकेत येण्यास अडचण येत असल्यामुळे व बँकेतही गर्दी होत असल्यामुळे बँक प्रतिनिधींची नेमणूक केलेली आहे, या प्रतिनिधींकडे गावनिहाय यादया देण्यात आलेल्या आहेत. हे प्रतिनिधी थेट गावा गावात जाऊन त्या ठिकाणी बायामेट्रिक पध्दतीने व आधार क्रमांकाची सांगड घालून रक्कम गावातच देण्याची व्यवस्था केलेली आहे. विशेष म्हणजे या बँक प्रतिनिधींकडे पैसे काढणे व पैसे भरणे अशा दोन्ही सुविधा उपलब्ध असल्यामुळे बँकेत येणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.
बँकेचे प्रतिनिधी सचिन सिरसाट हे तालुक्यातील रोशनगाव या गावातील ग्राम पंचायत कार्यालयात बसून ही सेवा देत आहेत. तर, दुसरे प्रतिनिधी रमेश आडे यांनी अकोला, निकळक व कंडारी या तीन गावात घरोघरी जाऊन बँकिंग सेवा देत आहेत. विशेष म्हणजे बायोमेट्रिकवर बोट ठेवल्यानंतर प्रत्येकवेळी मशीन सॅनिटाईझ करण्यात येऊन ग्राहकाच्या आरोग्याची काळजीही घेतली जात आहे. या अभिनव उपक्रमांमुळे बँकेच्या शाखेतील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. या पॅटर्नचा अंवलब जर सर्वच बँक शाखेने केला तर या बदनापूर पॅटर्नमुळे बँकेत गर्दी कमी होऊन सोशल डिस्टन्सिंग ही पाळता येईल.