बदनापूर (जालना) - जून महिन्याच्या सुरवातीपासूनच तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील सर्वात मोठा सोमठाणा अप्पर दुधना प्रकल्पात पाच वर्षानंतर पहिल्यांदा मोठा पाणीसाठा जमा झाला. या जलसाठ्याचे जलपूजन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले.
बदनापूर तालुक्यात यंदा निसर्गाची चांगलीच कृपा आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला. चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात १३ फूट पाणी आले असून मागील पाच वर्षानंतर पहिल्यांदाच या धरणात एवढा जलसाठा जमा झाला आहे. सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प १९६५ मध्ये ८१ लाख रुपये खर्च करून झाले असून या प्रकल्पाचे उदघाटन तत्कालीन मंत्री डॉ. रफिक झकेरिया यांच्या हस्ते झालेले आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र २४८ चौरस कि.मी. आहे १९६२ मध्ये धरणाच्या बांधकामास सुरवात होऊन सदर काम तीन वर्षात पूर्ण झाले होते. धरणाची उंची १७.६८ फूट आहे ते एकूण पाणी साठा १५.३९ द.ल.घन मीटर आहे तर पाणलोट क्षेत्र २४८ चौरस किलो मीटर आहे.