जालना- जुन्या वादातून झालेल्या भांडणातून एका जणाच्या घरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या एका बहाद्दर पोलीस हवालदाराने सतर्कता दाखवून रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या पोलीस हवालदाराने थेट पिस्तूल रोखल्यामुळे टोळक्यातील काही जण शस्त्रे आणि वाहने जागीच सोडून पसार झाले आहेत. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राहुल ढाकणे, वैभव ढाकणे, लॉयल ढाकणे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ४ वाहनेही घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आली आहेत.
याबाबत माहिती अशी की, जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाजवळील बुंदेले चौकातील मंगलसिंग ठाकूर आणि मोदीखाना भागातील राहुल ढाकणे यांच्यात पूर्ववैमनस्यातून वाद होऊन भांडण झाले होते. या भांडणातून मंगलसिंग ठाकूर याच्या घरावर सोमवारी (ता.२६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहुल ढाकणे, वैभव ढाकणे या दोघासह १५ ते २० जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, चाकू, लाठ्या घेऊन थेट ठाकूर यांच्या घरात घुससे. त्यानंतर मंगलसिंग कुठे आहे, असे म्हणत घरातील महिला व वृद्धांना मारहाण केली. त्यानंतर मंगलसिंग ठाकूर यांची आई शोभा ठाकूर यांच्या गळ्यावर एका जणाने चाकू ठेवून मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात या भागातून जात असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सॅम्युएल कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथे गेले.