जालना: बाळासाहेब हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि संयमी नेते असल्याचेही चव्हाण म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. त्यामुळेच, हा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. आता याप्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी अशोक चव्हाण यांनी आपण पुढाकार घेऊन पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब हे संयमी नेते :बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आताच कळाले असून थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब हे पक्षाचे वरिष्ठ आणि संयमी नेते आहेत. विशेष म्हणजे, आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेईन. कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी जे करावे लागेल ते सर्वकाही करणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. थोरात यांनी पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी ठामपणे व्यक्त केला.