बदनापूर- लष्करी अळीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. खरीप हंगामातील जवळपास 90 टक्के मका पिकांचे नुकसान लष्करी अळीने केल्याचे भयान चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. तालुक्यात लष्करी अळीने अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. खरीपातील मका व बाजरी पिकांची नासाडी झालेली असताना या अळीने शेतकऱ्यांना हतबल केले आहे.
बदनापूर तालुक्यातील शेतकरी सध्या दुष्काळाला तोंड देत आहेत. सरासरीच्या 40 ते 50 टक्के पाऊसही अजून या तालुक्यात पडलेला नाही. आता ऐन दुष्काळातच शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. दुष्काळात तेरावा महिना ठरलेल्या लष्करी अळीने खरीपातील मका व बाजरी पिकांची 100 टक्के नासाडी केल्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी तज्ज्ञांचीही झोप उडाल्याचे दिसून येत आहे. लष्करी अळीने सध्या शेतकऱ्यांचे जीणे मुश्किल करून टाकले आहे. या किडीला अन्नसुरक्षेसाठी जागतिक धोका जाहीर करण्यात आले आहे.
बदनापूर तालुक्यात लष्करी अळीचा धूमाकूळ बदनापूर तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात असलेल्या मक्याची शेती, बाजरीची शेती आणि ऊसाची शेती अमेरिकन लष्करी अळीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. शेतमालाला भाव नसताना त्रस्त झालेल्या शेतकर्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो चाऱ्याचा आणि चारा म्हणून शेतकरी सगळ्यात जास्त मका या पिकाचा उपयोग करतात. त्यानंतर शेतकरी उपयोग करतात ज्वारीपासून बनलेल्या कडब्याचा आणि त्यानंतर आणीबाणीच्या प्रसंगी उसाचा वापर चारा म्हणून केला जातो. सध्या मक्याची शेती संकटात आहे. मक्यावर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. ही कीड एका रात्रीत मक्याच्या फडाचे नुकसान करते. त्यामुळे तालुक्यातील नगदी पीक असलेले मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा - बदनापुरात राजेंद्र भोसल्यांनी शिवसेनेची साथ सोडून केला मनसेत प्रवेश
लष्करी कीड मका पिकांची पाने खाऊन नुकसान करते. प्रथमावस्थेतील अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करते. एका बाजूने खरडवून खाल्ल्यामुळे पानावर पांढरे ठिपके दिसून येतात. दुसर्या व तिसर्या अवस्थेतील अळ्या पानावर छिद्र पाडून पाने खायला सुरुवात करतात. मका पीक पोंग्यामध्ये असताना जर किडीचा प्रादुर्भाव झाला तर पान उघडल्यानंतर पानावर एका रांगेत गोल गोल छिद्र दिसून येतात. मका पिकात सुरुवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो. मात्र, नंतरच्या अवस्थेत पूर्ण पोंग्याचे नुकसान होते. मक्याच्या एका झाडावर एक अळी असेल तर उत्पादनात जवळपास 50 टक्केपर्यंत घट होते. तालुक्यातील पिकांवर तर एका झाडावर चार ते पाच अळ्या पडलेल्या दिसत असून पूर्ण मकाच नेस्तानाबूत झाल्याचे दिसून येत आहे.
बदनापूर तालुक्यात या किडीचा प्रादुर्भाव जुलै महिन्यात मका पिकांवर झाल्याचा सर्वप्रथम निदर्शनास आले होते. तेव्हापासून तालुका कृषी विभाग व कृषी तज्ज्ञ या अळीचा नायनाट व्हावा, म्हणून प्रयत्नशील होते. परंतु, या अळींचा प्रार्दूभाव कमी होण्याऐवजी वाढत गेला. सद्यस्थितीत मका शेतीची अतिशय दयनिय अवस्था असून संपूर्ण झाड या अळीने खाऊन टाकलेले दिसते. पोंग्यात या अळीने केलेल्या घाणीशिवाय काहीही दिसून येत नाही. लष्करी अळीने कोंब खाल्ल्यामुळे मक्याचे कणीसच तयार झालेले नाही. अशा परिस्थितीत ही उभी मका जनावरांनाही कापून खाऊ घालता येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अळीचा प्रार्दूभाव असलेले झाड जर पाळीव प्राण्यांनी खाल्ले तर त्याचा परिणाम या जनावरांवरही होत आहे. काही ठिकाणी लष्करी अळीग्रस्त बाजरी व मका खाल्याने जनावरे दगावल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत मका व बाजरीपासून उत्पन्नाच्या आशेवर बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना या अळीने मेटाकुटीस आणले असून बाजरी व मकाला कणसे आलेच नाही व जेथे आले त्यात दाणेच भरलेले दिसून येत नाही. त्यामुळे आता मका व बाजरी सोंगणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर आहे.
हेही वाचा -जालन्यातील भागडे सावरगाव शिवारात अंगावर वीज पडून तीन ठार तर दोन जखमी
मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे रब्बी हंगामात ज्वारी व इतर पिके न आल्याने शेतकऱ्यांकडे आधीच चाऱ्याचा गंभीर प्रश्न होता. खरीपाच्या मका व बाजरीचा हिरवा चारा जनावरांना खाऊ घालता येईल, या मानसिकतेने शेतकऱ्यांनी बाजरी व मका लागवड केलेली असताना लष्करी अळीमुळे हा चाराही जनावरांना खाऊ घालता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून इतकडून तिकडून महागडा चारा आणून कसेबसे पशूधन सांभाळावे लागत आहे. कृषी विभाग व कृषी तज्ज्ञांनी या अळीचा प्रार्दूभाव कमी करण्यासाठी पाउले उचलण्याची गरज आहे.