जालना -जिल्ह्यातील भोकरदन येथे प्रतिबंधित बियाणे विक्री प्रकरणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने कृषी सेवा केंद्रावर कारवाई करून सहा पाकिटे जप्त केली. ही कारवाई रविवारी करण्यात आली. कपाशीचे प्रतिबंधित बियाणे दुकानात आढळल्याने भोकरदन पोलिसात अनिल पारख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण भरारी पथकाचे अधिकारी सुधाकर कराड यांनी भोकरदन येथील अनिल पारख यांच्या बियाणे दुकानात अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांना प्रतिबंधित एचटीबीटी या कपाशींच्या बियाणांची सहा पाकिटे आढळून आली. या प्रकरणी अनिल पारख यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. हे बियाणे कुठून आणले हेही सांगता न आल्याने त्यांच्या विरुद्ध कराड यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कराड यांच्या तक्रारीवरुन पारख यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.