जालना - कामगार कार्यालयात नाव नोंदणीसाठी कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दी सोबतच दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसून हे दलाल काम करत असल्यामुळे येणाऱ्या गरजूंना हे दलाल असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे हे गरजू दलालांच्या गळाला लागत आहेत. त्यातच कार्यालयात शिपाई नसल्यामुळे या लोकांकडून काम करून घेत असल्याचा दुजोरा ही कामगार अधिकारी कराड यांनी दिला. त्यामुळे या सर्व प्रकाराला कामगार अधिकाऱ्यांची मूक संमतीच आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जालना कामगार कार्यालयात दलालांचा सुळसुळाट, पोलिसांना केले पाचारण - शिपाई
जालना कामगार कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला असून कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसून हे दलाल काम करत असल्यामुळे येणाऱ्या गरजूंना हे दलाल असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे हे गरजू दलालांच्या गळाला लागत आहेत.
बांधकाम करणाऱ्या कामगारांची कामगार कार्यालयात नोंद झाल्यानंतर त्यांची छाननी होऊन संबंधित कामगारांना शासनातर्फे बांधकाम साहित्य घेण्यासाठी ५ हजार रुपये देण्यात येतात. तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना ही मोठ्या प्रमाणात मदत मिळते. त्यामुळे येथे नाव नोंदणीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊनच दलालांनी येथे उच्छाद मांडला आहे. ५०० ते दीड हजार रुपयापर्यंत नाव नोंदणीसाठी हे दलाल पैसे घेऊन त्यांना पावती देण्याचे टाळत आहेत. आधीच अप्रशिक्षित असलेले हे कामगार या दलालांच्या हातात सापडत असल्यामुळे त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. हा सर्व प्रकार कामगार अधिकारी कराड यांच्या बाजूलाच असलेल्या टेबलवर राजरोसपणे होत आहे. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे.
कार्यालयात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत कराड यांना विचारणा केली असता या कार्यालयात ३ शिपायांच्या जागा आहेत. मात्र, त्या रिक्त असल्यामुळे यांच्याकडून साफसफाईची कामे करून घेतली जातात, असे सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र हे दलाल कर्मचाऱ्यांच्या टेबल खुर्चीवर जाऊन बसतात. त्यामुळे आलेल्या कामगारांना हे कर्मचारी वाटतात आणि आपसूकच हे कामगार या दलालांच्या गळाला लागतात. आज येथे झालेली प्रचंड गर्दी पाहता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले.