जालना -उद्यापासून कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र, नियोजित ठरलेल्या ठिकाणांपैकी घट झाली असून आता फक्त चार ठिकाणीच उद्या लसीकरण होणार आहे. तर परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये लसीकरणाचा ड्रायरन झाला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे लसीकरण आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका खाली इमारतीमध्ये होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संपर्क -
जालना जिल्ह्यात उद्या चार ठिकाणी या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी नऊ वाजता या लसीकरणाला सुरुवात होईल. तसेच या लसीकरणा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार येथे सर्व यंत्रणा काम करत आहे.