जालना - जन आरोग्य योजनेतील निलंबित केलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याची चौकशी करावी, त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना समोर आणावे, या मागणीसह विमा कंपनीला वाचविण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाबाधित रुग्णांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश केला नाही. त्यामुळे शासनाचे सुमारे चौदाशे कोटी रुपये बुडाले आहेत, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
आज (दि. 13) या पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जन आरोग्य योजना आणि कोरोनाबाधित रुग्णांची होणारी लूट यासंदर्भात आम आदमी पक्षाने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाने दिनांक 23 मे रोजी एक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने विमा कंपनीला 699 रुपये भरल्यानंतर कोविड -19 चा आजार झालेल्या रुग्णांचे 28 हजार रुपये शासनाला नुकसान भरपाई मिळणार होती. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शिधापत्रिका धारकांचा या योजनेत समावेश केला नाही. महाराष्ट्रात दहा लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी पाच लाख लोकांनी सामान्य रुग्णालयात उपचार घेतले.