जालना- बदनापूर तालुक्यातील मौजे कुंभारी येथे आप्पासाहेब ओंकार उगले यांच्या शेतात साठविलेला २१२ आणि अन्य एका ठिकाणी साठवलेला १४९ ब्रास वाळूचा अवैध साठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी शनिवारी बदनापूर तालुक्यातील मौजे कुंभारी येथे उगले यांच्या शेतात धाड टाकून विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला अवैध वाळू साठा आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले.
जालन्यात सोळा लाखांचा अवैध वाळू साठा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई - police
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ लाख ३६ हजार सातशे वीस रुपयांची वाळू, पाच लाख २० हजार रुपयांचे दोन ट्रॅक्टर आणि अन्य एक १४९ ब्रास वाळूचा साठा, असा सुमारे १६ लाख ६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यासोबतच त्यांच्या शेताच्याच जवळील दुसऱ्या एका ठिकाणी असलेला १४९ ब्रास वाळूचा साठाही त्यांनी जप्त केला. वाळू साठा जप्त करण्यासाठी पोलिसांनी महसूल विभागालाही बोलावले होते. यामध्ये ६ लाख ३६ हजार सातशे वीस रुपयांची वाळू, पाच लाख २० हजार रुपयांचे दोन ट्रॅक्टर आणि अन्य एक १४९ ब्रास वाळूचा साठा, असा सुमारे १६ लाख ६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आप्पासाहेब ओंकार उगले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.