महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

fuel price hike : 'हेच का अच्छे दिन' म्हणत युवासेनेची जळगावात सायकल रॅली - जळगाव सायकल रॅली

जळगावात युवा सेनेच्या वतीने रविवारी (31 ऑक्टोबर) दुपारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीत सहभागी झालेल्या युवा शिवसैनिकांनी 'हेच का अच्छे दिन' म्हणत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मोदी सरकारने इंधन दरवाढ तत्काळ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

जळगाव सायकल रॅली
जळगाव सायकल रॅली

By

Published : Oct 31, 2021, 2:02 PM IST

Updated : Oct 31, 2021, 2:10 PM IST

जळगाव - केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ, जळगावात युवा सेनेच्या वतीने रविवारी (31 ऑक्टोबर) दुपारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो युवा शिवसैनिक या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारवर साधला निशाणा

या सायकल रॅलीत सहभागी झालेल्या युवा शिवसैनिकांनी 'हेच का अच्छे दिन' म्हणत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मोदी सरकारने इंधन दरवाढ तत्काळ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अनेक आश्वासने दिली होती. मात्र, आज महागाई अनियंत्रित असून सर्वसामान्य जनतेला उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले आहे. हे मोदी सरकार भांडवलदारांच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

शिवसेना कार्यालयापासून निघाली रॅली

शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिकांनी सायकल रॅली काढली. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेनेचे प्रताप पाटील, शिवराज पाटील यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते सायकल रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली पुढे नेहरू पुतळा, कोर्ट चौक, जिल्हा क्रीडा संकुल, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यचौक मार्गे आकाशवाणी चौकात आली. तेथून त्याच मार्गाने परत येऊन टॉवर चौकात रॅलीचा समारोप झाला.

महागाई नियंत्रणात मोदी सरकार अपयशी

सातत्याने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ करणारे मोदी सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. म्हणून 'हेच का अच्छे दिन' असा सवाल करत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. 'अच्छे दिन'चा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले आहे. संपूर्ण राज्यामधील जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले, अशी माहिती युवा सेनेचे प्रताप पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Last Updated : Oct 31, 2021, 2:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details