जळगाव- कंजारभाट जातपंचायतीच्या जाचास कंटाळून एका 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना 2 दिवसांपूर्वी जळगावात घडली आहे. मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे (रा. कंजरवाडा, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. मानसीच्या आई-वडिलांनी 20 वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यामुळे तिला कंजारभाट जातीत सामावून कुळ देण्यास जातपंचायतीच्या सदस्यांसह तिच्या आजोबांचा नकार होता. हा त्रास असह्य झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.
हेही वाचा -समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार
मानसीचे वडील आनंद बागडे हे 'एमएसईबी'त नोकरीला आहेत. त्यांनी 20 वर्षांपूर्वी बानो नामक महिलेशी आंतरधर्मीय विवाह केला होता. या दोघांना मानसी आणि काजल या मुली आहेत. मात्र, हा विवाह आनंद यांचे वडील दिनकर बागडे यांना मान्य नव्हता. ते कंजारभाट जातपंचायतीचे सरपंच असल्याने त्यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता. म्हणून त्यांनी आनंद यांचा आधी विवाह झालेला असताना जातीतील दुसऱ्या महिलेशी विवाह लावून दिला होता. या विवाहानंतर आनंद हे बानो यांना सोडून दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते. दरम्यान, आता आनंद यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी मानसीचे लग्नाचे वय झाले होते. तिचा विवाह कंजारभाट समाजातील मुलाशी व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. याप्रश्नी मानसीचे काका विजय बागडे यांनी पुढाकार घेत तिच्यासाठी समाजातील कोल्हापूरचा मुलगा शोधला होता. परंतु, तिचे आजोबा दिनकर बागडे यांचा तिला जातीत घेऊन 'जातगंगा' देण्यास विरोध होता. आजोबांचा नकार असल्याने जातपंचायतीचा देखील या गोष्टीला विरोधच होता. या जाचाला कंटाळून अखेर मानसीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
असे फुटले घटनेचे बिंग