महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

झळा दुष्काळाच्या : जळगाव जिल्ह्यात भूजल पातळी ४ मीटरपर्यंत खालावली - दुष्काळाच्या झळा

जिल्ह्याची भूजल पातळी सातत्याने घटत असल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून डार्कझोन जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये नव्याने विंधन विहिरी खोदणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात भूजल पातळी ४ मीटरपर्यंत खालावली

By

Published : May 15, 2019, 4:25 PM IST

जळगाव- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जळगाव जिल्ह्यातील ६६ पाणलोट क्षेत्रांमध्ये नुकत्याच केलेल्या भूजल सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ७ ते ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तब्बल ४ मीटरपर्यंत खालावली आहे. विशेषकरून, केळी लागवड होणाऱ्या जळगाव, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सर्वात जास्त घटली आहे.

जळगाव जिल्ह्यात भूजल पातळी ४ मीटरपर्यंत खालावली

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद या सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी जानेवारी ते मे महिन्यादरम्यान करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तब्बल ४ मीटरपर्यंत खालावली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कुपनलिका खोदण्यावर बंदी-

जिल्ह्यातील ६६ पाणलोट क्षेत्रांपैकी १२ क्षेत्र हे अंशतः शोषित, २ क्षेत्र शोषित, १० क्षेत्र अतिशोषित आहेत. उर्वरित क्षेत्र हे अद्याप धोकादायक नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सातत्याने घटत असल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून डार्कझोन जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये नव्याने विंधन विहिरी खोदणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

काही तालुक्यांमध्ये भूजल पातळी अर्धा मीटरने तर काही तालुक्यांमध्ये तब्बल साडेतीन ते चार मीटरने घटली आहे. सर्वात जास्त भूजल पातळी घटलेल्या तालुक्यांमध्ये यावल (३.९७ मीटर), रावेर (३.९४ मीटर), जळगाव (२.८१ मीटर), बोदवड (२.८० मीटर), मुक्ताईनगर (२.०४ मीटर) या तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये भूजल पातळी अद्याप फारशी घटली नसली तरी प्राथमिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचार करायला भाग पाडणारी आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाआधारे केंद्रीय भूजल मंडळाने २०११ मध्ये जाहीर केलेल्या भूजल मूल्यांकनानुसार जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यात आता पुन्हा जिल्ह्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने अधिक भर पडली आहे. मागील वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याची भूजल पातळी अजून घटली आहे. सातत्याने घटत जाणारी भूजल पातळी ही धोक्याची घंटा असून जलसंधारणाच्या बाजूने विचार करायला लावणारी असल्याचे मत भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

परिस्थिती बिकट होण्याची शक्यता-

वर्षानुवर्षे एकच पीक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी पट्टा असणाऱ्या जळगाव, यावल, रावेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. नद्या-नाले, धरणे कोरडेठाक पडले आहेत. पाऊस लांबला तर जिल्ह्यात अजून परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details