महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हास पाटलांच्या पराभवामुळे विवरेकरांचे 'खासदारांचे गाव' होण्याचे स्वप्न भंगले..! - एकनाथ खडसे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत झालेल्या वाटाघाटीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांना संधी दिली होती. मात्र, भाजपच्या रक्षा खडसेंनी डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव केल्याने पुन्हा एकदा खासदारांचे गाव होण्याचे विवरेकरांचे स्वप्न भंगले आहे.

डॉ. उल्हास पाटील

By

Published : May 26, 2019, 5:45 PM IST

जळगाव- रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांचा तब्बल ३ लाख ३५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. १९९८ या वर्षीचा अपवाद वगळता डॉ. उल्हास पाटील यांच्या पदरी आतापर्यंत पाच पराभव आले आहेत. त्यांच्या पराभवामुळे त्यांचे गाव असलेल्या विवरेकरांचे खासदारांचे गाव होण्याचे स्वप्न देखील भंगले आहे.

डॉ. उल्हास पाटील हे रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक या गावाचे रहिवासी आहेत. या गावाचा इतिहास देखील रंजक आहे. खासदारांचे गाव म्हणून विवरे बुद्रुक जळगाव जिल्ह्यात ओळखले जाते. कारण विवरे बुद्रूक या गावाने आतापर्यंत देशाला पाचवेळा खासदार दिले आहेत. त्यात स्व. काकासाहेब राणे हे सलग चारवेळा खासदार होते. तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.

विवरे बुद्रूक येथील रहिवासी असलेले काकासाहेब रंगू राणे हे सन १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७ असे सलग चार वेळा काँग्रेस पक्षाकडून खासदार झाले होते. यामुळे केवळ जिल्हाच नव्हे तर देशाच्या संसदेपर्यंत विवरे बुद्रुक गावाचे नाव पोहोचले होते. त्यांच्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेसने १९९८ मध्ये संधी दिली होती. या निवडणुकीत डॉ. उल्हास पाटील यांचा विजय झाल्याने पुन्हा एकदा विवरे बुद्रुक गाव चर्चेत आले होते. मात्र, तेव्हा त्यांची खासदारकी अवघी १३ महिन्यांची ठरली. यानंतर सन १९९९, २००४, २००९ व २०१४ (अपक्ष) अशा चार लोकसभा निवडणुकीत उल्हास पाटलांचा पराभव झाला.

पुढच्या काळात तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन रावेर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तसेच एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे नामकरण जळगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून झाले. नंतर रावेर लोकसभेची जागाही काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला रावेरमध्ये येणारे अपयश लक्षात घेता, यावेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रावेरची जागा आपल्या पदरात पाडून घेतली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत झालेल्या वाटाघाटीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांना संधी दिली होती. मात्र, भाजपच्या रक्षा खडसेंनी डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव केल्याने पुन्हा एकदा खासदारांचे गाव होण्याचे विवरेकरांचे स्वप्न भंगले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details