महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात विजया बँकेवर जबरी दरोड्याचा प्रयत्न; गोळीबारात बँक अधिकारी ठार

हेल्मेटधारी  दरोडेखोरांचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेचा एक अधिकारी ठार झाला आहे.

विजया बँक

By

Published : Jun 18, 2019, 3:52 PM IST

Updated : Jun 18, 2019, 4:54 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर मंगळवारी दुपारी २ वाजता सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हेल्मेटधारी दरोडेखोरांचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेचा एक अधिकारी ठार झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगावात विजया बँकेवर जबरी दरोड्याचा प्रयत्न

निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेवर दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास २ हेल्मेटधारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांना बँक अधिकारी करण नेगे यांनी विरोध केला असता त्यांच्या छातीत २ गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी बँकेचा सायरन वाजवल्याने दरोडेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. सायरनचा आवाज ऐकून मधुकर साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील, पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बँकेकडे धाव घेत बँकेचे शाखा व्यवस्थापक करण नेगे यांना जखमी अवस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवले.

गंभीर जखमी झाल्याने नेगे यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे पथकासह बँकेत दाखल झाले. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.

दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. नाशिक येथे याच आठवड्यात बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली होती. तेथेही दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. आता जळगाव जिल्ह्यात देखील तशीच घटना घडली आहे.

Last Updated : Jun 18, 2019, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details