जळगाव-जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात लॉकडाऊनदेखील वाढवण्यात आला आहे. परिणामी नागरिक घरी असून त्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. यातच भाजीपाला देखील महागला असून खर्चाचे बजेट कोलमडले आहे. आवक कमी जास्त होत असल्याने सर्वाधिक वापर होत असलेल्या कोथिंबीरीचे दर तिपटीने वाढले आहेत, तर हिरव्या भाज्या दुपटीने महागल्या आहे. ऐन कोरोनाच्या संकटात नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनमुळे 30 दिवसापासून काम बंद आहे. अनेकांना पगार मिळालेला नाही अथवा अत्यल्प मिळालेला आहे. त्यामुळे आहे त्याच उत्पन्नात जगणेही सामान्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. घरखर्च भागवणाऱ्या गृहिणींना वाढत्या महागाईच्या काळात कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न पडला आहे. घर चालवण्यासाठी प्रत्येक बाबींच्या खर्चाचे बजेट ठरलेले असते. त्यापेक्षा जास्त खर्च करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे रोज भाजी आणणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अशा महिला कडधान्यांना प्राधान्य देत आहेत. मात्र, तरी देखील हिरव्या पाले भाज्यांच्या भावातील झालेल्या वाढीमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.