जळगाव- जिल्ह्यात सलग २ दिवस वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे ३० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका बसला आहे. यात ९ तालुक्यांमधील २९४ गावांवर संकट कोसळले आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांसह केळी व इतर पिकांचे ३० हजार २६० हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.
गेले २ दिवस सलग जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत गारपीट देखील झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. जळगाव तालुक्यातील भोकर, घार्डी, भादली खुर्द यासह परिसरातील गावांमध्ये रब्बी पिकांसह केळी व इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. लोकांच्या घरावरील पत्रेही उडाली आहेत.
त्याचप्रमाणे चोपडा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर आणि यावल तालुक्यात देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीबाबत कृषी विभागातर्फे शेतात जावून पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार प्राथमिक नुकसानीचा अहवाल बनवून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना सादर केला आहे. वादळी वारा व गारपिटीमुळे २९४ गावांमधील ३१ हजार ११७ शेतकरी बाधित झाले आहेत. जळगावसह यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्यांना- सर्वाधिक फटका बसला आहे.
केळीचे साडेपाच हजार हेक्टरवर नुकसान