जळगाव - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतर मदतीबरोबरच आर्थिक मदतीची आवश्यकता भासत आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केलेले आहे. या संधीचा फायदा घेत काही अनोंदणीकृत संस्था, संघटना व व्यक्ती निधी गोळा करताना दिसत आहेत. अशांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तरी संस्था व नागरिकांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीची रक्कम नोंदणीकृत संस्थेकडेच जमा करण्याचे आवाहन धर्मादाय उपायुक्त जळगाव यांनी केले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी इतर मदतीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील तसेच राज्यातील सर्वच घटकांना पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोंदणीकृत संस्था व न्यासाकडून मदत मिळणे सुरू झाले आहे. मदत जमा करताना कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५०च्या कलम ४१ (सी) मध्ये विहित केलेल्या तरतुदींचा अवलंब केल्याखेरीज कोणाकडूनही निधी रक्कम गोळा करू नये. या तरतुदीचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती, अनोंदणीकृत संस्था, व्यक्ती समूह फौजदारी कार्यवाहीस पात्र ठरतात. वर्गणी देताना निधीची रक्कम घेणारा व्यक्ती, संस्था किंवा व्यक्ती समूह कायदेशीरपणे निधीची रक्कम गोळा, जमा करीत असल्याबाबत खात्री करूनच निधी जमा करावा, असेही धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे धनादेशाद्वारे द्या निधी -
साहाय्यता निधीसाठी जमा करावयाची वर्गणी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळ https:cmrf.maharashtra.gov.in/DonationOnlineForm.action चा वापर करून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींद्वारेही जमा करता येईल. याशिवाय साहाय्यता निधी जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयातही रोख अथवा धनादेशाद्वारे जमा करता येईल. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, व्यक्ती समूह यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन धर्मादाय उपायुक्त यांनी केले आहे.