जळगाव - दारू पिताना झालेल्या वादातून दोन तरुणांनी बिअरच्या फुटलेल्या बाटलीने हॉटेल मालकाच्या मानेवर वार करत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ असलेल्या आसोदा मटण हॉटेलमध्ये घडली. प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (५०, रा. आसोदा ता. जळगाव) असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. भरदिवसा ही थरारक घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नेरीनाका स्मशानभूमीजवळ असलेल्या आसोदा मटण हॉटेलमध्ये दोन तरुण दारू पीत बसले होते. यावेळी त्यांचा हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांच्याशी कुठल्यातरी विषयावरून वाद झाला. शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारीत दोन्ही तरुणांनी प्रदीप चिरमाडे यांच्या मानेवर बिअरच्या फुटलेल्या बाटलीने वार केले. त्यामुळे चिरमाडे गंभीर जखमी झाले.
हेही वाचा...धनंजय मुंडे फायटर, लवकरच बरे होतील; राजेश टोपेंचा विश्वास
रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने चिरमाडे खाली कोसळले. यानंतर दोन्ही हल्लेखोर तरुण घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेत अन्य दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. काही समजायच्या आतच हा थरार घडला. त्यानंतर जखमी अवस्थेत प्रदीप चिरमाडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.