जळगाव-वाघूर धरणातून पाणी सोडल्याने वाघूर नदीला आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील रेल्वे पुलाजवळ घडली आहे. सिंधूबाई अशोक भोळे (वय 65) आणि योगिता राजेंद्र भोळे (वय 35) अशी पुरात वाहून गेलेल्या महिलांची नावे आहेत. दोघी नात्याने सासू-सून असून, त्या साकेगाव येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने नदीपात्रात त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधूबाई भोळे व त्यांची सून योगिता भोळे या दोन्ही साकेगावातील मशिदीच्या मागे राहत होत्या. दोघींच्या पतींचे निधन झाल्याने त्या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या वाघूर नदीपात्रात वाळू गाळण्याचे काम करत होत्या. गुरुवारी सकाळी देखील त्या वाळू गाळण्याच्या कामासाठी नदीपात्रात गेल्या होत्या. त्या सकाळी नदीपात्रात गेल्या तेव्हा वाघूर नदीला फारसे पाणी नव्हते. मात्र, बुधवारी रात्रीच्या वेळी वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गुरुवारी सकाळी धरणाचे 2 दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. तत्पूर्वी सिंधुबाई व योगिता भोळे या नदीपात्रात काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या वरील बाजूस गेलेल्या होत्या.