जळगाव -शहरातील व्यापाऱ्याकडून ३५ लाख रुपयांचा कांदा खरेदी करुन बील बुडवणाऱ्या कर्नाटक येथील हायप्रोफाईल व्यापाऱ्यास पोलिसांनी अटक केली. एमआयडीसी पोलिसांनी कर्नाटकातील एका जंगलातून त्याला अटक केली आहे. व्यापाऱ्यांच्या या टोळीने देशभरात अशा प्रकारे बोगस व्यवहार करुन अनेक व्यापाऱ्यांची सुमारे 40 कोटी रुपयांची फसवणूक केलीअसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - Plastic Ban: प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी 'भांड्यांची बँक', पाहा काय आहे अनोखा उपक्रम
मोहम्मद एजाज इस्माईल भिस्ती (वय 29, रा. बद्रिया कॉलनी, भटकल, जि. करवार, कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर त्याचे साथीदार मोहम्मद शफिक इस्माईल भिस्ती, हारुन रशिद, मोहम्मद ईशाद (सर्व रा. कर्नाटक) हे अद्याप बेपत्ता आहेत.
प्रकरणातील एक संशयित मोहम्मद शफिक याचे रबा ट्रेडर्स नावाचे कर्नाटकमध्ये दुकान आहे. या माध्यमातून तो जळगावातील शनिपेठेत राहणाऱ्या शब्बीर अब्दुल्ला खान (वय-65) यांच्या संपर्कात आला. खान हे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत व कमिशन एजंट यांच्याकडून कांदे, लसून खरेदी करुन ते विक्री करण्याचा व्यवसाय करतात. शफिक याने सुरुवातीला खान यांच्यासोबत व्यापार सुरू केला. जळगावातून 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा माल तो कर्नाटकमध्ये मागवत होता. त्याचे बील वेळोवेळी अदा करीत होता. यातून दोघांमध्ये व्यापाराचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते.
दरम्यान, यानंतर 25 नोव्हेंबर 2017 रोजी शफिक याने खान यांना फोन करुन 10 ट्रक कांदा पाहिजे असल्याचे सांगितले. हा कांदा परदेशात पाठवायचा असल्याने लवकरात लवकर पाठवा असेही त्याने सांगितले. त्यानुसार खान यांनी 25 ते 28 नोव्हेंबर 2017 या तीन दिवसात 6 ट्रक भरुन कांदे बंगळुरू येथे शफिककडे पाठवले. या कांद्याची किंमत 35 लाख 11 हजार 893 एवढी झाली होती. शफिककडून बील वेळेवर अदा करण्याचा अनुभव असल्याने खान यांनी विनासंकोच कांदा पाठवला. हा कांदा शफिकसह सर्व भागीदारांनी ताब्यात घेऊन ट्रकचे भाडे दिले होते.
काही दिवसानंतर खान यांनी बील मागण्यासाठी शफिकला फोन केला. याला प्रतिसाद म्हणून शफिकने कोरा चेक पाठवला होता. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर खान यांनी थेट कर्नाटक येथे जाऊन त्याकडे पैसे मागितले. यावेळी शफिससह त्याच्या भागीदारांनी पैसे दिले नाही. उलटपक्षी 'पैसे मिळणार नाही, काय करायचे ते कर' अशी धमकी खान यांना दिली होती. तेथून हतबल झालेल्या खान यांनी जळगाव गाठले होते. यानंतर 28 ऑक्टोबर 2019 रोजी खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन फसवणूक करणाऱ्या खानसह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करीत पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी कर्नाटक येथे जाऊन खान याला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील तपास करीत आहेत.