जळगाव- जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या सातत्याने वाढत आहे. आज जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 2 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12वर पोहचली आहे. मृत्यू झालेल्या दोघांमध्ये एक रुग्ण चोपडा तालुक्यातील अडावद येथील तर दुसरा पाचोरा येथील आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडी कक्षात आजपर्यंत एकूण 5 हजार 967 रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. त्यात स्वॅब घेतलेले 36 रुग्ण पॉझिटिव्ह तर 555 रुग्ण निगेटिव्ह निष्पन्न झाले आहेत. 36 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 12 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शुक्रवारी स्क्रिनिंग ओपीडी कक्षात 126 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात 35 संशयितांना कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने दाखल करून घेण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.