महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : कारागृह रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून तीन कैद्यांचे पलायन

जळगाव जिल्हा कारागृहातून तीन कैद्यांनी कारागृह रक्षकाच्या डोक्यावर पिस्तूल लावत पलायन केले आहे. कारागृहात पिस्तुल आल्याच कशा, असा सवाल उपस्थित होत आहे.

jalgaon district jail
jalgaon district jail

By

Published : Jul 25, 2020, 8:16 PM IST

जळगाव- दरोडा, प्राणघातक हल्ला या सारख्या गंभीर गुन्ह्यात बंदी असलेल्या तीन कैद्यांनी थेट कारागृह रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून, त्याचा गळा दाबून चाव्या हिसकावत कारागृहातून पलायन केले आहे. यातील एक कैदी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारागृहात पिस्तूल आल्याच कशा? हा मुख्य प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

सुशील अशोक मगरे (रा. पहूर कसबे, ता. जामनेर), सागर संजय पाटील व गौरव विजय पाटील (दोघे रा. अमळनेर), असे पलायन केलेल्या कैद्यांची नावे आहेत. त्यांनी कारागृहरक्षक पंडीत दामू गुंडाळे (वय 47, रा. कारागृह वसाहत) यांच्या डोक्याला पिस्तूल लावत ठार मारण्याची धमकी दिली. शनिवारी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गुंडाळे हे मुख्य प्रवेशद्वारावर गेटकिपर म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. त्यामुळे सर्व चाव्या त्यांच्याकडेच होत्या. सुरुवातीला सागर त्यांच्याकडे आला. त्याने कारागृह रक्षक कुलदीप दराडे यांची ड्युटी कुठे व किती वाजता आहे? याची विचारणा गुंडाळेंकडे केली. यानंतर तो निघून जाताच गौरव तेथे आला. सागर व गौरव हे दोघे कारागृहात ऑफिस बॉयचे काम करीत असल्यामुळे ते कामासाठी ऑफिसच्या दिशेने निघून गेले. यानंतर सुशील मगरे हा देखील गेटजवळ येऊन उभा राहिला. टेबल जवळील पेटी पाहण्याच्या बहाण्याने सागर व गौरव गुंडाळे त्यांच्याजवळ आले. सुशीलही लागलीच तेथे आला. या तिघांनी क्षणार्धात कमरेत खोचलेल्या पिस्तूल काढून एकाच वेळी गुंडाळे यांच्यावर रोखल्या. सुशील याने गुंडाळेंच्या डोक्यावर पिस्तूल रोखून शिवीगाळ करत चाव्या दे, नाहीतर खल्लास करुन टाकेल, अशी धमकी दिली. तर गौरव याने गुंडाळेंना खाली पाडून त्यांच्या पँटच्या खिशातून चाव्या काढून घेतल्या. यानंतर गौरवने गुंडाळे यांना स्वच्छतागृहाकडे ओढत नेले. तर सुशील व सागर या दोघांनी मेनगेटचे कुलूप उघडून पलायन केले. त्या पाठोपाठ गौरव याने गुंडाळेंवर पिस्तूल रोखून गेटपर्यंत आणले. त्यांना गेटजवळ सोडून गौरवने देखील पलायन केले. या तिघांना घेण्यासाठी कारागृहाच्या बाहेर जगदीश पुंडलिक पाटील (रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) हा दुचाकी घेऊन उभा होता. तिघे कैदी बाहेर आल्यानंतर सर्वजण जगदीशच्या दुचाकीवर बसून पळून गेले. यावेळी गुंडाळे यांनी आरडा-ओरड केली असता कारागृह रक्षक विक्रम हिवरकर बाहेर आला. त्यांनी कैद्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तिघे पळून गेले हाेते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फरार झालेल्या कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद्यांच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथके तातडीने रवाना झाली आहेत.

पालकमंत्र्यांकडून तातडीने कारागृहात पाहणी

या घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने कारागृहात जाऊन पाहणी केली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी विचारणा केली. कारागृहातील मनुष्यबळ आणि जागेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आल्याने शासनाकडे त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. या घटनेसंदर्भात त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी देखील केली.

‘अशी’ आहे फरार झालेल्या कैद्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

सुशील मगरे

सुशील मगरे याने 12 सप्टेंबर, 2017 रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद पोलीस दुरक्षेत्रात कर्तव्यावर असताना गुन्हेगार असलेल्या साथीदारांच्या मदतीने नेरी-औरंगाबाद रस्त्यावरील माळपिंप्रीजवळ ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सुशील मगरे याला अटक झाली होती. त्याचप्रमाणे, रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्समधून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याच्या गुन्ह्यातही तो आरोपी आहे. या प्रकरणी सध्या तो अटकेत होता.

सागर पाटील व गौरव पाटील

पारोळा तालुक्यातील‍ पिंपळकोठा येथे पिलकदेव महाराज यात्रेदरम्यान पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद उफाळला होता. यावादात सागर संजय पाटील व गौरव विजय पाटील यांच्यासह इतर तीन आरोपींनी भांडण सोडविण्यास आलेल्या एकावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. यानंतर आरोपी चोरीच्या दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी सागर पाटील याला पारोळा पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून अटक केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details