जळगाव -रेल्वेस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले एक फुटवेअरचे गोडाऊन अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरटे एका महागड्या कारमधून आले होते. त्यांनी गोडाऊनचे शटर लोखंडी वस्तूने उचकटून गोडाऊनमधील सव्वातीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. मंगळवारी मध्यरात्री १.४५ ते २.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. चाेरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
महागड्या कारमध्ये येऊन चोरट्यांनी फोडले फुटवेअरचे गोडाऊन, सव्वातीन लाखांची रोकड लंपास
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोगारांची संख्या वाढली. त्यामुळेच की काय चोरी, खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारीच जळगावात एका लक्झरी कारमधून येऊन चोरट्यांनी गोडाऊन फोडल्याची घटना घडली.
भरत मिहानी यांच्या मालकीचे हे फुटवेअरचे होलसेल गोडाऊन आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे गोडाऊन बंद करून ते घरी गेले होते. यानंतर मध्यरात्री १.४५ वाजता महागड्या कारमधून पाच ते सहा चोरटे तेथे आले. त्यातील दोघांनी पायऱ्यांवर बसून कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तास प्रयत्न करूनही कुलूप तुटले नाही. यानंतर त्यांनी गोडाऊनच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली. यानंतर दहा मिनिटात दोन चोरटे गोडाऊनच्या आत गेल्याचे आतील सीसीटीव्हीत दिसून आले आहेत. चोरट्यांनी लोखंडी वस्तूने शटर उचकटून व कापून आत प्रवेश केला होता. आतमध्ये असलेल्या कार्यालयात शिरुन चोरट्यांनी शोधाशोध सुरू केली. ड्रॉवर फोडून त्यातील सुमारे सव्वातीन लाख रुपयांची रोकड काढून घेतली. या चोरट्यांना बाहेर उभे असलेले इतर साथीदार मदत करीत होते. ते रस्त्यावर नजर ठेऊन होते. पैसे हाती लागल्यानंतर सर्व चोरटे कारमधून पळून गेले.
दरम्यान, पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास या भागात गस्त घालत असलेल्या गुरख्याला या गोडाऊनचे शटर खुले दिसून आले. त्याने लागलीच गोडाऊनचे मालक भरत मिहानी यांना फोन करुन माहिती दिली. मिहानी गोडाऊनवर येताच त्यांनी शहर पोलिसांना संबंधित माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मिहानी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.