महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव एपीएमसीच्या व्यापाऱ्यांचा बंद सुरूच; संरक्षण भिंत पाडल्याने प्रकरण चिघळले

नियोजित व्यापारी संकुलासाठी बाजार समितीची संरक्षण भिंत कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहे. त्यामुळे पाडलेली संरक्षण भिंत पुन्हा बांधावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून बंद पुकारला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती

By

Published : Jun 21, 2019, 9:47 PM IST

जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने नियोजित व्यापारी संकुलासाठी बाजार समितीची संरक्षण भिंत कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहे. त्यामुळे पाडलेली संरक्षण भिंत पुन्हा बांधावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून बंद पुकारला आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बदलल्यानंतर नवीन सभापतींनी लगेचच बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेली संरक्षण भिंत पाडली आहे. बाजार समितीच्या आत असलेल्या सेवा रस्त्याला लागून व्यापारी संकुल उभारण्यासाठी ही भिंत पाडण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.


व्यापारी संकुल उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने दोन वेळा परवानगी नाकारली आहे. तसेच 2014 पासून हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. तरी देखील आर्थिक मलिदा लाटण्यासाठी संकुल उभारण्याचा खटाटोप सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.


संरक्षण भिंत पाडल्यामुळे व्यापाऱ्यांचा माल चोरीला जाण्याची भीती असल्याने ही संरक्षण भिंत पुन्हा बांधावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती
भिंत पाडल्यानंतर व्यापाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांसोबत बैठक झाली होती. त्यात संरक्षण भिंत पुन्हा बांधून देण्याचे सर्वानुमते ठरले होते. मात्र भिंत बांधण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने व्यापाऱयांनी जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बंद पुकारला आहे.


शुक्रवारी चौथ्या दिवशीही हा बंद सुरूच आहे. या विषयासंदर्भात तोडगा निघाला नाही, तर सोमवारपासून साखळी उपोषण करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे बाजार समितीत दररोज होणारे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.


दाणा मार्केट बंद ठेऊन नोंदवला निषेध-
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला दाणा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या दाणा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी आपले सर्व व्यवहार थांबवून ठेऊन कडकडीत बंद पाळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details