महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यातील सव्वाचारशे वाचनालयातील ग्रंथसंपदा 'टाळेबंद' - ग्रंथालयांवर कोरोनाचा परिणाम न्यूज

जळगाव जिल्ह्यातील तब्बल साडेचारशे वाचनालये कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहेत. ही वाचनालये उघडून वैचारिक मेजवानी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाचनप्रेमींसह ग्रंथालय चालकांकडून केली जात आहे.

The Coronavirus' Impact on jalgaon district Libraries
कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यातील सव्वाचारशे वाचनालयातील ग्रंथसंपदा 'लॉकडाऊन'

By

Published : Sep 6, 2020, 2:03 PM IST

जळगाव -कोरोना महामारीच्या साथीच्या उद्रेकामुळे अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. व्यापार, उद्योग, कृषी अशा क्षेत्रांवर कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम तर झाला आहेच, याशिवाय शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रही कोरोनामुळे प्रभावित झाली आहेत. जळगाव जिल्ह्याच्या वैचारिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारी तब्बल साडेचारशे वाचनालये कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहेत. वाचनालये बंद असल्याने ग्रंथसंपदा 'लॉकडाऊन' आहे. राज्य शासनाने आता लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करत काही बाबींना सशर्त सूट दिली आहे, त्याच धर्तीवर वाचनालये उघडून वैचारिक मेजवानी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाचनप्रेमींसह ग्रंथालय चालकांकडून केली जात आहे.

ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे साधन म्हणून पुस्तकांकडे पाहिले जाते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या पाच महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील सव्वाचारशे वाचनालयांमध्ये ग्रंथसंपदा लॉकडाऊन झाली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व सार्वजनिक वाचनालय बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वेळ आहे. हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तरी राज्य शासनाने सर्व सार्वजनिक वाचनालय सुरू करावीत, अशी मागणी वाचनप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. दिवसातून किमान चार तास तरी सार्वजनिक वाचनालये उघडी ठेवावीत, अशी मागणी होत आहे. वाचनालये मर्यादित वेळेत जरी उघडी राहिली तरी वाचकांची वाचनाची भूक भागून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात घरी बसण्याचा वेळ सत्कारणी लागून कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचा बचावही करता येईल, अशी वाचनप्रेमींचे म्हणणे आहे.

ग्रंथालय कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया...
ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी होतेय कसरत -कोरोना संसर्गामुळे गेल्यात पाच महिन्यांपासून सार्वजनिक ग्रंथालये तसेच वाचनालये बंद आहेत. वाचनालये नियमित सुरू असल्यास येणाऱ्या वाचकांपुढे ग्रंथ व पुस्तके हाताळली जातात. त्यामुळे ग्रंथ व पुस्तकांची वेळोवेळी सफाई आपोआप होत असते. गेल्या पाच महिन्यांपासून वाचनालये बंद असल्याने ग्रंथांच्या नियमित सफाईवर देखील परिणाम झाला आहे. नियमितपणे साफसफाई होत नसल्याने वाचनालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथ व पुस्तके सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रंथ आणि पुस्तकांची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने ती जीर्ण होऊन खराब होण्याची भीती असल्याचे जळगावातील खूप प्राचीन असलेल्या व. वा. वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. राज्य शासनाने आता वाचनालये सुरू करायला हवी, जेणेकरून वाचकांची वाचनाची भूक भागू शकते. आज दूरचित्रवाणीवर कोरोनाच्या बातम्यांच्या भडीमार सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार पुस्तके, ग्रंथ वाचायला मिळाले तर त्यांचा वेळ सत्करणी तर लागेल, याशिवाय त्यांच्या मनात सकारात्मक विचार येतील. आमच्या वाचनालयाचे सुमारे दोन ते अडीच हजार सभासद आहेत. दीड लाखांवर पुस्तके व ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. तरी शासनाने आता वाचनालये उघडली पाहिजेत, अशी अपेक्षा अनिल अत्रे यांनी व्यक्त केली.
वाचनालय सुरू करण्यास हरकत नाही -
सध्या नागरिक लॉकडाऊनमुळे घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाची भूक भागवण्याचे काम पुस्तके करू शकतात. मात्र, सार्वजनिक वाचनालये बंद असल्याने वाचनप्रेमी नागरिकांची गैरसोय झाली आहे. वाचनालयात मार्केटप्रमाणे गर्दी नसते. त्यामुळे राज्य शासनाने वाचनालये सुरू करायला हरकत नाही. सर्व वाचनालये उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी, फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळून आम्ही सर्व उपाययोजना करू शकतो. वाचनालय बंद असल्याने कार्यालयीन कामासाठी आम्हाला वाचनालयात यावे लागते. पुस्तके व ग्रंथांची देखभाल करावी लागते, असे व. वा. वाचनालयातील लिपिक अनिल भावसार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details