जळगाव - शहरातील कोळीपेठेत राहणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शरद विठ्ठल कोळी (वय 31, रा. कोळीपेठ, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली. दरम्यान, शरदचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त करून त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
शरद कोळी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत औद्योगिक वसाहतीतील ई सेक्टरमध्ये आढळून आला. एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी येऊन पोलिसांनी प्राथमिक पंचनामा केला. मृत शरदची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी शरदच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
हेही वाचा -बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन, इंधन पुरवठा ठप्प