जळगाव - समाजात स्वीकारण्यास आजोबांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या एका 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी जळगावमधील कंजरवाडा येथील सिंगापूर भागात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधितांनी तब्बल 12 तास युवतीचा मृतदेह घरातच ठेवत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना युवतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
निर्भया (नाव बदललेले) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. या घटनेसंदर्भात मिळालेली माहिती अशी की, निर्भयाचे वडील हे एका मागासवर्गीय समाजाचे आहेत. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी 15 वर्षांपूर्वी दुसऱ्या धर्माच्या महिलेशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्यांना निर्भयासह 2 मुली आहेत. मात्र, निर्भयाच्या आजोबांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता. त्यांनी निर्भयाच्या वडिलांचा प्रेमविवाह झालेला असताना आपल्याच समाजातील एका महिलेशी लग्न लावून दिले होते. तेव्हापासून निर्भयाचे वडील त्या दुसऱया पत्नीसोबत राहत होते. तर निर्भयाची आई दोन्ही मुलींसोबत जळगाव शहरातील कंजरवाड्यात विभक्त राहत होती.
निर्भयाचे लग्नाचे वय झालेले होते. त्यामुळे तिचे आपल्याच समाजातील मुलाशी लग्न व्हावे म्हणून, तिच्या काकांनी पुढाकार घेतला होता. तिच्यासाठी कोल्हापूरचे स्थळही आलेले होते. मात्र, तिच्या आजोबांनी तिला समाजात घेण्यास विरोध दर्शविला होता. विनवणी करुनही आजोबांनी आपली भूमिका बदलली नाही. शेवटी निर्भयाने हतबल होऊन गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.