जळगाव - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा हिंसाचार गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळे आज जळगावच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दंगलीच्या काळात गृह मंत्रालय नेमके काय करत होते, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
'मागील 5 वर्षे ज्यांनी पारदर्शक काम केल्याचा दावा केला, अशा केंद्र सरकारने याप्रकरणी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर द्यायला हवे. त्यांनी याबाबत जाहीर माहिती दिली पाहिजे. अमित शाहांच्या जागी मी असते, तर निश्चितच आत्मचिंतन केले असते,' असेही त्या यावेळी म्हणाल्या.