जळगाव - जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे येथे एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. ३१ जुलै) मध्यरात्रीनंतर घडली असून, ती आज (रविवारी) सकाळी उजेडात आली. मुकेश कैलास सोनवणे (वय 22) आणि नेहा बापू ठाकरे (वय 19) अशी मृतांची नावे असून, दोघेही वाडे गावातील रहिवासी होते.
व्हॉट्सअपवर 'बाय' स्टेटस ठेऊन प्रेमीयुगुलाची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या, जळगावातील प्रकार - जळगावात प्रेमीयुगुलाची आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे येथे एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुकेश व नेहा हे एकाच समाजाचे असून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.
वाडे गावातील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीतील वरच्या मजल्यावर जिन्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मुकेश व नेहा या प्रेमीयुगुलाने जीवनयात्रा संपवली. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली. त्यानंतर गावचे पोलीस पाटील अरविंद पाटील यांनी भडगाव पोलिसांना घटनेची माहिती कळवली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ वाडे गावात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पोलीस पाटील, अरविंद पाटील यांच्या माहितीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेमप्रकरणातून घटना घडल्याचा संशय -
ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुकेश व नेहा हे एकाच समाजाचे असून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, समाजाकडून प्रेमाला मान्यता मिळणार नाही. या भीतीपोटी दोघांनी टोकाचे पाऊल उलचत जीवनयात्रा संपवली असावी, असा अंदाज आहे.
घटनास्थळी संशयास्पद पुरावे नाहीत -
या घटनेबाबत 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी सांगितले की, मुकेश व नेहा या प्रेमीयुगुलाने शाळेच्या इमारतीत जिन्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात तसे स्पष्ट होत आहे. आम्हाला घटनास्थळी संशयास्पद पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे दोघांनी प्रेमप्रकरणातूनच आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. तरीही पोलीस या घटनेचा सर्व बाजूने तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमीयुगुलाने व्हॉट्सअपवर 'बाय' असे स्टेटस ठेवले आहे किंवा नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही. तपासकामी त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले जातील, त्यात ते समोर येईलच. शिवाय त्यांनी कोणाशी संपर्क केला होता, यासारख्या काही बाबी स्पष्ट होतील, असेही तपासाधिकारी सोनवणे यांनी सांगितले.