जळगाव: दोन वर्ष कोरोनामुळे बसेस बंद होत्या, त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस बंद आहेत. या बंदमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर जळगावातील टेहू येथील आयटीआय महाविद्यालयात शिक्षक असणारे एम.व्ही.पाटील यांनी एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळा आणि कॉलेजला जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
अशी सुचली संकल्पना - जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टेहू ( Tehu in Parola taluka ) या गावात राहणारे शिक्षक एम. व्ही. पाटील यांनी आपल्याकडील मोटारसायकलला ट्रॉली जोडत, त्यांनी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर केली आहे. बसेस बंद असल्यामुळे शहरी भागात शिक्षणासाठी रोज ये-जा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या पालकांकडे खासगी वाहन आहे, ते आपल्या पाल्यांना शाळेत नियमित पाठविण्याचा प्रयत्न करीत असतात. काही शिक्षणप्रेमी मात्र अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे टेहू, ता. पारोळा येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील हे आहेत.
ट्रॉली ओढू शकते दहा क्विंटल वजन - पाटील हे दगडीसबगव्हाण ते टेहू ( Dagdisbagvhan te tehu ) येथे रोज मोटारसायकलने जात असतात. अगोदर कोरोना महामारीमुळे व आता एसटीचा बेमुदत संप यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाहनाची वाट पाहणारे अनेक विद्यार्थी रस्त्याच्याकडेला उभे असतात. ते पाहून पाटील यांच्यातला शिक्षक जागा झाला. त्यांनी 10 क्विंटल वजन ओढू शकेल, अशी चार टायरची ट्रॉलीच बनविली आणि ती आपल्या मोटारसायकलला जोडली. शाळा उघडल्यापासून ते रोज 10 ते 12 विद्यार्थ्यांना या ट्रॉलीत बसवून पारोळा येथे शिकवणी व शाळेच्या कामासाठी ( Bike Trolly Journey )सोडतात. तसेच संध्याकाळी परत जाताना देखील त्यांना परतीच्या प्रवासातही मदत करतात.