जळगाव -मुंबईत नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, मागील साडेचार वर्षांपूर्वी जळगावातही अशाच प्रकारे एका माजी सैनिकासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण झाली होती. परंतु, अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. मुंबईतील घटनेची ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे; तशी जळगावातील घटनेबाबत साधी चर्चाही झाली नाही. मुंबईतील प्रकरण उचलून धरणाऱ्या भाजपचेच तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासह काही जणांनी माजी सैनिकाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
सोनू हिंमत महाजन, असे मारहाण झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. ते चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील रहिवासी आहेत. देशाची सेवा करताना जीवाची पर्वा न करणाऱ्या या माजी सैनिकाला मात्र न्यायासाठी लढावे लागत असल्याची परिस्थिती आहे. 2 जून, 2016 रोजी टाकळी येथे सोनू महाजन व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. आमच्याविरुद्ध सतत तक्रारी करतो, म्हणून संशयित आरोपी मुकुंद कोठावदे, भावेश कोठावदे, भारती कोठावदे, पप्पू कोठावदे, लक्ष्मीबाई कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे, जितेंद्र वाघ आणि तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी मारहाण केल्याचा सोनू महाजन यांचा आरोप आहे. या घटनेत सोनू महाजन यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावामुळे सोनू महाजन यांची फिर्याद दाखल करून घेतली नव्हती. मात्र, महाजन यांच्या पत्नी मनीषा यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर खंडपीठाच्या आदेशानंतर या प्रकरणात 7 मे, 2019 रोजी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांच्यासह इतर नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी घटनेचा प्राथमिक तपास करून या गुन्ह्यात भा. दं. वि.चे कलम 395, 307, 324, 143, 147, 149, 504, 506, 4/25, 148, अशी कलमे लावली आहेत. मात्र, या गुन्ह्यात आतापर्यंत काहीच प्रगती नाही.
याच प्रकरणात 3 जून, 2016 रोजी मुकुंद भानुदास कोठावदे यांच्या तक्रारीवरून सोनू महाजन व किसनराव जोर्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सोनू महाजन यांची तक्रार चाळीसगाव पोलिसांनी नोंदवून घेतली नव्हती. पण, सोनू महाजन यांना पोलिसांनी अटक केली होती, असाही आरोप महाजन यांच्या पत्नी मनीषा महाजन यांनी केला होता.