जळगाव- अनेक मोठी संकटे आली, अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली. मात्र, अशाही परिस्थितीत जळगावचे ग्रामदैवत असलेले रथचौकातील श्रीराम मंदिर कधीही कुलूपबंद राहिले नव्हते. सुमारे 500 वर्षांची थोर परंपरा असलेले हे पुरातन श्रीराम मंदिर पहिल्यांदाच रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कुलूपबंद आहे. जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावत असल्याने तो रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन पाळला जात आहे. अशा परिस्थितीत श्रीराम मंदिर कुलूपबंद ठेवण्याची वेळ श्रीराम मंदिर संस्थानवर आली आहे.
रामनवमीच्या दिवशी श्रीराम मंदिर प्रथमच कुलूपबंद... हेही वाचा-COVID 19 : एमी पुरस्कार विजेत्या गायकाचं कोरोनामुळे निधन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे राज्य शासनाचे आदेश आहे. या आदेशामुळे गेल्या 500 वर्षात पहिल्यांदाच रामनवमीच्या दिवशी जळगावातील रथचौकातील मंदिर कुलुपबंद ठेवण्याची वेळ श्रीराम मंदिर संस्थानवर आली आहे. शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात आले. मात्र, श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते सकाळी विधिवत आरती करण्यात आली. रामनवमी असतानाही कोरोनामुळे कुलूपबंद मंदिराच्या बाहेरुनच भाविकांनी दर्शन घेतले. तर बंद मंदिराच्या आतुनच मंगेश महाराजांनी दर्शनार्थ आलेल्या भाविकांना सामाजिक अंतर ठेवत प्रसादाचे वाटप केले.
एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मंदिर कुलूपबंद असल्याने याप्रसंगाचे मंगेश महाराज यांनी अतिशय भावनिक पद्धतीने वर्णन केले. महाभारतात ज्याप्रमाणे तुरुंगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्याप्रमाणे आज कुलूप बंद मंदिराच्या आतून प्रसाद देण्याची वेळ आली असल्याचा दुर्देवी प्रसंग ओढावला असल्याचे त्यांनी सांगितले.
भक्तांविना प्रथमच श्रीराम जन्मोत्सव-
श्रीराम जन्मोत्सव, मंदिरांमध्ये असणारी भाविकांची मांदियाळी, दुपारी बाराच्या ठोक्याला जयघोष, पाळण्याच्या दर्शनासाठी चालणारी लगबग, अशा उत्साही वातावरणात दरवर्षी साजरा होणारा श्रीराम जन्मोत्सव यंदा प्रथमच भाविकांविना साजरा झाला. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने असल्याने शहरातील मंदिरांमध्ये केवळ पुजारी व एक ते दोन जणांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा झाला. या उपस्थित मोजक्या मंडळींनीही 'सोशल डिस्टन्सिंग' ठेवून धार्मिक उत्सवातही सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.