जळगाव -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी सोमवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पक्षांतर्गत कलह आणि गटबाजीच्या मुद्द्यावर हा मेळावा चांगलाच गाजला. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी गटबाजीवरून मेळाव्यात एकमेकांना चांगलेच चिमटे काढले. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षसंघटन बळकट करण्यासाठी आपापसातील मतभेद, गटतट विसरण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
जळगाव जिल्हा शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षांतर्गत कलह, गटबाजीच्या मुद्द्यावर खल; नेत्यांचे एकमेकांना चिमटे अन् कोपरखळ्या - पालकमंत्री गुलाबराव पाटील
पक्षांतर्गत कलह आणि गटबाजीच्या मुद्द्यावर जळगावमध्ये आयोजित शिवसेनेचा मेळावा चांगलाच गाजला. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी गटबाजीवरून मेळाव्यात एकमेकांना चांगलेच चिमटे काढले.
-jalgaon-district-shiv-sena-meet
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा मेळावा पार पडला. मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील आदींची उपस्थिती होती.
शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. यासह पक्षांतर्गत गटबाजी आणि कलहामुळे दोन्ही नेत्यांमधले संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात होत असलेल्या मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील हजेरी लावतात की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, गुलाबराव पाटील यांनी मेळाव्याला हजेरी लावली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी भाषणात एकमेकांना लक्ष्य केले.
काय म्हणाले चिमणराव पाटील?
मेळाव्यात भाषण करताना आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, आजवर मी मूल्याधिष्ठित राजकारण केले. परंतु, मला डावलण्याचा प्रयत्न झाला. माझा बळी गेला तरी चालेल. मात्र, ज्या संघटनेने मला इथवर आणले, त्या संघटनेला मी कधीही अंतर देणार नाही. आजवर मी स्वच्छ राजकारण केले. आता सरतेशेवटी मी कशाला माझ्या कारकिर्दीला डाग लावून घेऊ. आपल्याला पक्ष संघटना बळकट करायची असेल तर आपापसातील मतभेद दूर करावे लागतील, असे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कानपिचक्या -
मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपल्या भाषणात चांगल्याच कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, मी एका बापाची औलाद आहे. आजवर मी कधीही शिवसेनेशी गद्दारी केली नाही, करणार नाही. असे असताना ज्यांनी डोक्यात ठेवले असेल त्यांनी डोक्यातच ठेवावे. पक्षाने मला भरपूर दिले आहे. एका टपरीवाल्याला पक्षाने आमदार केले. अजून काय हवे आहे. आपला झेंडा एकच, एकच नेता बाळासाहेब ठाकरे. पक्ष जो आदेश देईल, त्याचे आपण पालन करायचे, हेच माझे काम असते, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Last Updated : Jul 12, 2021, 10:08 PM IST