जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांची चिंता करावी. ज्यांचे स्वतःच घरच नाही, त्यांनी दुसऱ्याच्या घरात कशाला ढुंकावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील एरंडोल येथे आयोजित सभेत पवार यांनी मोदींवर टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिले. मोदींनी वर्धा येथे झालेल्या सभेत पवार घराण्यावर टीका केली होती. त्यांचा धागा पकडून पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. या सभेत पवार यांनी सरकारच्या ५ वर्षातील कामगिरीचे वाभाडे काढले. त्याचप्रमाणे राफेल विमाने खरेदी, शेतकरी आत्महत्या, देशाची संरक्षण व्यवस्था आदी विषयांवर परखड मत व्यक्त केले. गांधी घराण्यावर पवारांनी स्तुतीसुमने उधळली.
शरद पवार पुढे म्हणाले, की या सरकारकडे बोलायला विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे ते वाट्टेल त्या गोष्टींवर बोलत आहेत. वर्ध्यात ते म्हणाले शरद पवारांना त्यांच्या नव्या पिढीने घराबाहेर काढले आहे. मला एकच मुलगी आहे. ती खासदार आहे. ती तिच्या नवऱ्याच्या घरी राहते. मी आणि माझी पत्नी माझ्या घरी राहतो. माझ्या पुतण्याने पक्षावर ताबा मिळवला म्हणे. राष्ट्रवादी पक्ष संपला, अशा वल्गना त्यांनी केल्या. मात्र, राष्ट्रवादी पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांनी मेहनतीने वाढवलेला पक्ष आहे, असेही पवार म्हणाले.
'त्यांनी दुसऱ्याच्या घराविषयी काय बोलावं'