जळगाव Sharad Pawar On Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मात्र ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण दिल्यास पुन्हा जटील प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता, मराठा आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार ( Sharad Pawar)यांनी जळगाव इथं केली. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचं शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केलं.
ओबींसीच्या आरक्षणाला हात लावू नका :जालना इथं मराठा आंदोलकांवर सरकारनं लाठीहल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिल्यास पुन्हा जटील प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला हात न लावता, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. इतर मागासवर्गीय समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीचा त्याला पाठिंबा असणार नसल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला हात न लावता, आरक्षण वाढवून देण्याची मागणीही शरद पवार यांनी केली.
मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला कोणी केला, स्पष्टीकरण द्यावं :सरकारनं मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत मंत्रालयातून आदेश देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीर गटानं मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर, मंत्रालयातून फोन करुन आम्ही लाठीहल्ला केल्याचं सिद्ध करुन दाखवा, आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ, मात्र सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून बाहेर जावं, असा दमचं दिला होता. यावर शरद पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता, सरकारच्या वतीनं माफी मागितली, त्यातच सगळं आल्याची कोपरखळी पवार यांनी मारली. सरकारनं लाठीहल्ला केला नसल्यास लाठीहल्ला कोणी केला, याचं स्पष्टीकरण सरकारनं द्यावं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.