जळगाव -भाजप सरकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय कधीही घेणार नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक महत्त्व देणार आहे. उद्या आमच्या हातात सत्ता आली तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे दिले.
विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे जाहीर प्रचारसभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर पवारांनी खान्देशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ केला. सभेत जिल्ह्यातील आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी केंद्र व राज्य सरकारची ध्येयधोरणे, नोटबंदी, ईडी चौकशी अशा विषयांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. शरद पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय सर्वात आधी आम्ही घेतला होता. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. आता आमची सत्ता आली तर शेतकऱ्यांचे कर्ज कोण आणि कसे वसूल करते हे बघू, असा निर्वाणीचा इशारा देखील यावेळी पवारांनी दिला.
महाराष्ट्र राज्याचा मूळ गाभा हा काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात आहे. शेती हा राज्यातील बहुसंख्य लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. पण आज शेती आणि शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यावर्षी पाऊस चांगला होता म्हणून परिस्थिती वेगळी असू शकते. पण शेतकरी जेव्हा चांगला शेतमाल पिकवतो, तेव्हा सरकार त्याच्या मालाला भाव देत नाही. आता कांद्याचे उदाहरण देता येईल. कांद्याला यावेळी चांगला भाव मिळाला. परदेशातून भारतीय कांद्याला मागणी वाढली. शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होऊन त्यांना दोन पैसे मिळू लागले. पण इकडे शहरी लोक कांद्याचे भाव वाढले म्हणून ओरड करू लागले. त्यामुळे सरकारने कांद्याची निर्यात थांबवली. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसला. हे सरकार लोकांच्या दोन वेळेची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर टाटा, बिर्ला, गोदरेज अशा कॉर्पोरेट सेक्टरच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी यावेळी केली.