जळगाव - रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागझिरी नदीला पूर आला. या पुरात ७ जण अडकून पडले होते. सुदैवाने त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
सातपुडा पर्वत रांगांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने रावेर तालुक्यामधून वाहणाऱ्या नागझिरी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात ऐनपूर रस्त्यावर ७ ग्रामस्थ अडकून पडले होते. नदीला आलेल्या पुराचा जोर ओसरत नसल्याने अडकून पडलेल्या सातही जणांचा जीव धोक्यात होता. शेजारील गावाच्या ग्रामस्थांनी धाव घेत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधने उपलब्ध नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. यामुळे ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली. मात्र, घटनास्थळी कुठलाही महसूल अधिकारी, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलीस यंत्रणा आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.