जळगाव- राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन दिल्याने एकच खळबळ उडाली होती. तेव्हा बॉम्बशोधक व नाशक पथकाने महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसराची कसून तपासणी केली. मात्र, त्या ठिकाणी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. चौकशीअंती हा खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब; उडाली खळबळ
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन दिल्याने एकच खळबळ उडाली होती. तेव्हा बॉम्बशोधक व नाशक पथकाने महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसराची कसून तपासणी केली. मात्र, त्या ठिकाणी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.
आज सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जळगाव पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांनी त्याच व्यक्तीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात देखील फोन करून हीच माहिती दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तेव्हा जिल्हा पेठ पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला सोबत घेऊन गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय गाठले.
पथकाने तातडीने कार्यालयातील उपस्थित नागरिकांना बाहेर काढून अत्याधुनिक उपकरणांसह तसेच प्रशिक्षित श्वानाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. या प्रकाराची माहिती देणाऱ्या व्यक्तीने खोडसाळपणा केल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांना ज्या क्रमांकावरून फोन आला आहे, त्या क्रमांकाची माहिती काढली जात आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.