जळगाव -खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या एका संशयिताकडे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले आहे. शहर पोलिसांनी या संशयितास अटक केली असून, करण प्रकाश पवार (वय 22, रा. गेंदालाल मिल) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे अक्रम शेख व सुधीर साळवे यांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांनी त्यावर नजर ठेवली होती.
हेही वाचा -दिल्ली हिंसाचार: ताहिर हुसेनच्या तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक
पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या पथकाने संशयिताला पकडण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला . संशयित हा रिक्षा पार्किंगजवळ आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून 11 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. गेल्या आठवड्यात करण याने गेंदालाल मिल परिसरातील शुभांगी सोनवणे यांच्या मालकीची दुचाकी मध्यरात्री जाळली होती. या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिली आहे.
दरोड्याच्या तयारीत असलेल्या नऊ सराईत गुन्हेगारांना मेहरूण तलाव परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आगे. या गुन्हेगारांकडे पिस्तूल आढळले आहे. करण पवार याच्याकडेही पिस्तूल मिळून आले. या दोन्ही पिस्तूल उमर्टी (मध्यप्रदेश) येथून आणल्याचे या गुन्हेगारांनी पोलिसांना सांगितले आहे. सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांकडे पिस्तूल मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -सांगलीत तिहेरी हत्याकांड.. मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून