महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रावेर मतदारसंघ : भाजपच्या प्रचारात शिवसैनिकांचा निरुत्साह, विजयासाठी काँग्रेसची कसरत - loksabha

या मतदारसंघात भाजपचे पाच आमदार, एक खासदार आहे. शिवाय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका, ग्रामपंचायतदेखील भाजपच्या ताब्यात आहेत.

डॉ. उल्हास पाटील, रक्षा खडसे

By

Published : Apr 20, 2019, 5:40 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. याठिकाणी भाजपचे हेवीवेट नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे तर काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे रिंगणात आहेत. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. त्यात शिवसेनेचाही सक्रीय सहभाग अल्प असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

रावेर मतदारसंघ

रावेर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावत आपली पाळंमुळं खोलवर रुजवली. १९९८ साली डॉ. उल्हास पाटील यांचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून रावेरात सातत्याने भाजपचा खासदार निवडून येत आहे. गुणवंतराव सरोदे, वाय.जी. महाजन, हरिभाऊ जावळे यांच्यानंतर रक्षा खडसे यांनी रावेर मतदारसंघाचे सातत्याने प्रतिनिधित्व केल आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे या ठिकाणी भाजपची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात भाजपचे पाच आमदार, एक खासदार आहे. शिवाय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका, ग्रामपंचायतदेखील भाजपच्या ताब्यात आहेत. उत्तम पक्ष संघटन, बूथ टू बूथ मार्किंग यादेखील भाजपच्या जमेच्या बाजू आहेत. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत दिलजमाईचा झाल्याचा दावा मध्यंतरी रक्षा खडसेंनी केला होता. परंतु, प्रचारात अजूनही शिवसैनिक न दिसणं ही एकमेव बाब काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडणारी आहे.

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांनी आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी रणनीती आखली आहे. रावेरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरु होती. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली. आपली लढाई थेट मोदींशी असून धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details