जळगाव -प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा धावता आढावा घेतला. दरम्यान, या दौऱ्यात आमदार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले होते. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असताना प्रणिती शिंदे यांनी शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या गर्दीत आढावा बैठका घेतल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असतानाही याठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जत्रा भरली होती.
प्रणिती शिंदेंचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. नाशिक, मालेगाव येथील आढावा घेतल्यानंतर शनिवारी त्या जळगावात दाखल झाल्या. दुपारी 12 वाजताच्या सुमारास अजिंठा विश्रामगृहात त्यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा आढावा जाणून घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्या आढावा घेत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, युवकचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आदींसह तालुकाध्यक्ष, विविध ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी आमदार शिंदे यांनी काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, इंटक, सेवादल तसेच एनएसयुआयच्या संघटनेचा आढावा घेत पक्षसंघटन वाढीच्या सूचना केल्या.
पक्ष संघटनेतील गटतट आले समोर
आमदार प्रणिती शिंदेंनी विविध ब्लॉक अध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच विविध कार्यकर्त्यांशी वन टू वन चर्चा केली. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. पक्ष संघटनेत गटतट असल्याने पक्षाच्या ताकदीवर परिणाम होत असल्याचा आरोपही काहींनी केला. जळगाव जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने आज पक्ष जिल्ह्यातील अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडत आहे. पक्ष संघटनेत अनेक पदे रिक्त आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने कामाची संधी द्यावी, अशी मागणीही काहींनी केली.